भुसावळ येथे चार तरुणांच्या टोळीकडून ट्रक चालकांची लूट

bhusaval gang

भुसावळ, प्रतिनिधी | येथील नॅशनल हायवे क्रमांक सहावरील रेल्वे उड्डाण पुलावर चार अज्ञात तरुणांनी ट्रक चालकांना थांबवून मारहाण करून लूट सुरू केल्याचा प्रकार गुरुवारी (दि.19) सायंकाळी ७.३०च्या सुमारास घडला. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मुंबई ते नागपूर जाणाऱ्या ट्रक चालकांना अडवून चार अज्ञात तरुण मारहाण करून त्याच्या जवळील पैशांची लूट करीत होते. त्यावेळी भीतीमुळे काही ट्रक चालकांनी तरुणांना पैसे दिल्याची माहितीही मिळाली आहे.

 

अधिक माहिती अशी की, सायंकाळी या तरुणांनी ट्रक चालकांना थांबवल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी वाहनांच्या रांगा लागल्याने कोणार्क हॉस्पिटल समोरून वाहनांची रहदारी सुरू झाली. त्या परिसरातील नागरिकांनी हायवेवर अपघात झाला असावा, यामुळे वाहने दुसऱ्या रस्त्याने येत असावीत, असे समजून परिसरातील नागरिकांनी वाहतूक शाखेचे प्रभारी निरीक्षक काशिनाथ सुरळकर यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. काही वेळातच ते घटनास्थळी पोहचणार त्याआधीच ट्रक चालकांना लुटणारे तरुण फरार झाले.

नागरिकांनी सुरळकरांना तरुण कुठल्या दिशेने पळाले, याची माहिती दिली असता वाहतूक शाखेचे वाहन चालक म्हणाले, आमचे अधिकारी वयोवृद्ध आहे त्यांच्या कडून पळले जाणार नाही कोणी तरी त्यांना मोटारसायकल द्या. अशी विनंती नागरिकांना केल्यानंतर त्यांना मोटरसायकल देण्यात आली. अज्ञात तरुणांचा पाठलाग करीत असतांना ते अचानक कुठे गायब झाले, हे निरीक्षकांना ही कळले नाही. ते उलट्या पावली परत आल्याने ट्रक चालकांना लुटणारी टोळी पुन्हा हायवेवर रस्ता लूट करणार तर नाही ना ? या शंकेमुळे वाहन चालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाने या टोळीला लवकरात-लवकर जेरबंद करण्याची मागणी परिसरातील सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Protected Content