दिल्ली वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय टोळीचा भांडाफोड दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात बेकायदेशीर रित्या विक्री करण्यापुर्वी 50 कोटी रुपयांची 12 किलो हेरोईन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण तीन लोकांना अटक केली असून यामध्ये एका नायझेरिअन व्यक्तीचा समावेश आहे, अशी माहिती दिल्ली पोलीसांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.
अनुभव दुशाद उर्फ विक्की (35) रा.मुनिरका दिल्ली, रेणुका (27) रा. भोपाळ आणि क्रिस्ट जोले (28) रा. नायजेरियन असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. जोले गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटक विजावर भारतात आला होता. पण त्यानंतर तो भारतात लपून राहत होता. “अनुभवकडे सात किलो, रेणुकाकडे तीन किलो आणि जोलेकडून दोन किलो हाय क्वॉलिटी हेरोइन जप्त करण्यात आले आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या या आंतरराष्ट्रीय टोळीचा भांडाफोड दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने केला आहे. ही टोळी राजधानी दिल्लीसह अनेक राज्यात हेरोइनसारख्या घातक पदार्थांची तस्करी करत होती. त्यासोबतच काही देशातही तस्करी केली जात होती”, असं उपायुक्त प्रमोदकुमार सिंह कुशवाह यांनी सांगितले.
या टोळीला पकडण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून पोली निरीक्षक ईश्वर सिंह यांची टीम काम करत होती. 14 डिसेंबर 2019 रोजी पोलिसांच्या विशेष पथकाला अनुभव दिल्ली रेल्वे स्टेशनजवळ पोहोचल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून अनुभव आणि रेणुकाला अटक केली, अशी माहिती उपायुक्त कुशवाहा यांनी दिली.