चेन्नई (वृत्तसंस्था) विद्यार्थ्यांवर कुठल्याही प्रकारचा आघात म्हणजे लोकशाहीने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा आघात आहे. थोडक्यात विद्यार्थ्यांविरोधात पोलिसी बळाचा वापर म्हणजे लोकशाहीच्या तोंडात मारण्यासारखं आहे, अशा शब्दात नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा अभिनेते कमल हासन यांनी जोरदार निषेध केला आहे. चेन्नई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कमल हासन पुढे म्हणाले की, जनतेच्या प्रश्नांची उत्तर नसल्यामुळे पकडले जाण्याच्या भीतीतून अशी ठोकशाही जन्माला येते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर या सरकारकडे फक्त अश्रूधूर आणि लाठीमार हेच उत्तर आहे. पण हा अन्याय, अत्याचार आम्ही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला. ‘नागरिकत्व कायद्याला होणारा विरोध हा राजकारण, पक्ष व राज्यांच्या सीमांच्या पलीकडचा आहे. हा राष्ट्रव्यापी विषय आहे,’ असेही ते म्हणाले. ‘राजकारण हे सर्वव्यापी असतं. त्याचा प्रत्येकावर परिणाम होत असतो. त्यामुळं तरुणांनी शिक्षण संस्थांमध्ये जाऊन केवळ अभ्यास करण्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्यांनी राजकारण समजून घ्यायला हवे. सत्तेत बसलेल्यांना प्रश्न विचारत राहायला हवे. देशातले तरुण राजकीयदृष्ट्या सजग असतील. तर त्यात काहीच चूक नाही. त्यांची मुस्कटदाबी होणार असेल तर लोकशाही धोक्यात घालण्यासारखे आहे,’ असे कमल हासन म्हणाले.