नवी दिल्ली वृत्तसंस्था । ओडिशा येथील चांदीपूर तळावर सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आल्याची माहिती संरक्षण दलातील सूत्रांनी नुकतीच दिली आहे. ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने मिळून विकसित केलेले सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे.
चांदीपूरमधील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या कॉम्पलेक्स ३ मध्ये मोबाइल लाँचरवरुन जमिनीवरुन जमिनीवर हल्ला करणाऱ्या ब्रह्मोसच्या आवृत्तीची चाचणी घेण्यात आली. या चाचणीने सर्व निकष पूर्ण केले आहेत असे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) सांगण्यात आले. युद्धनौका, पाणबुडी, मोबाइल लाँचर आणि फायटर जेटमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येते.
ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. भारताची मागच्या काही वर्षांपासून थायलंड, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशांबरोबर ब्रह्मोस विक्रीबद्दल चर्चा सुरु आहे. ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल असून ते जमीन आणि पाण्यातून हल्ला करण्यासाठी सक्षम आहे.