वर्धा वृत्तसंस्था । वर्ध्यासोबत माझी नाळ जुळली आहे. बारामतीनंतर मला इतर कुठे लढायची संधी मिळाली तर मी वर्ध्यावरुन खासदारकी लढेन, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. वर्ध्यातील सावंगी येथे आयोजित राज्यस्तरीय मुख्यध्यापकांच्या 59 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
पुढे म्हणाल्या की, ‘माझी राजकारणात आणि समाजकारणात जी काही ओळख आहे ती बारामतीमुळे आहे. मी हे बोललेलं बारामतीकरांना आवडणार नाही, पण जर कधी चॉईस करायची वेळ आली आणि बारामतीमधून दुसरा खासदार उभा राहिला तर मला आवडणारा जिल्हा आणि मतदारसंघ वर्धा आहे,’ असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी (ता. 14) येथील प्रसिद्ध झुणका भाकर केंद्राला भेट देऊन तेथील आहाराचा आस्वाद घेतला. वर्ध्याला आल्या म्हणजे त्या झुणका भाकर केंद्रात आवर्जून जेवण करतात. यावेळीही कार्यक्रमानिमित्त आल्या असता त्यांनी येथेच भोजन करणे पसंत केले. या मेजवाणीने तृप्त होत त्यांनी तिगावकर दांपत्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.