नवी दिल्ली वृत्तसंस्था । “केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांचे चांगले परिणाम दिसून येत असून येत्या काही वर्षांत अर्थव्यवस्था सुधारेल,” असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी सांगितले. अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीबद्दल त्यांनी सविस्तर सादरीकरण केले.
अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने गेल्या काही महिन्यांत उचललेल्या कृतींबद्दलही यात नमूद करण्यात आले आहे. मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यन यांनी त्यापूर्वी एका कृती आराखड्यावर चर्चा केली. देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी अमेरिकी डॉलरवर नेण्यासाठी काय उपाय करावे लागतील याचा या कृती आराखड्यात समावेश आहे. वाहन उद्योगक्षेत्रातील मंदी, देशांतर्गत मागणीत झालेली घट, जीडीपीच्या वृद्धिदराने गाठलेला निचांक यामुळे अर्थविश्वात चिंतेचे वातावरण आहे. केंद्र सरकार आर्थिक आघाडीवर अपयशी ठरल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी केंद्राने केलेल्या उपाययोजनांची विस्तृत माहिती दिली असून नजीकच्या भविष्यात अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर येईल, असा आशावाद व्यक्त केला.