नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे कायद्यात रुपांतर तसेच नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, ढासळती अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्या या विषयांवर काँग्रेसने आता मोदी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानुसार, दिल्लीत आज रामलीला मैदानावर काँग्रेसकडून ‘भारत बचाव रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे.
मोदी सरकारविरोधात शनिवारी दुपारी काँग्रेसकडून हे आंदोलन केले जाणार आहे. दुपारी 12 वाजताची या आंदोलनाची वेळ आहे. या रॅलीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी, प्रियांका गांधी, काँग्रेस कार्यकारिणीचे सर्व सदस्य सकाळी 11.15 वाजता रामलीला मैदानात पोहोचणार आहेत. काँग्रेसची रॅली यशस्वी करण्यासाठी देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते रामलीला मैदानात एकत्र जमत आहेत. या रॅलीमध्ये ‘मोदी है तो मंदी है’चा नारा दिला जाणार आहे. अशा घोषणा असलेल्या टी-शर्ट्सचे वाटप कार्यकर्त्यांना करण्यात येत. रॅलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरु आहे. रामलीला आणि दिल्लीत सर्वत्र काँग्रेसचे पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात आले आहेत. एकप्रकारची वातावरण निर्मिती काँग्रेसकडून केली जात आहे. रामलीला मैदानात काँग्रेसचे झेंडे आणि पोस्टर्स लावण्यात आले आहेत. पोस्टर्सवर सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे फोटो दिसत आहेत.काँग्रेस या रॅलीमध्ये आर्थिक मंदी, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या मुद्यांवरुन मोदी सरकारला घेरणार आहे. नागरिकत्व कायद्यावरुन ईशान्य भारतात उसळलेल्या हिंसाचाराच्या मुद्द्याबरोबरच पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये हा कायदा लागू न करण्याचा तिथल्या राज्य सरकारांनी घेतला आहे. हे मुद्देही यावेळी काँग्रेसच्या अजेंड्यावर असणार आहेत.