मुंबई, वृत्तसंस्था | मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज (दि.१३) घडली. त्यामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली होती, मात्र संरक्षक जाळीमुळे या तरुणीचा जीव वाचला आहे.
आज दुपारी मंत्रालयात हा धक्कादायक प्रकार घडला. प्रियंका गुप्ता असे या तरुणीचे नाव असून काही कामानिमित्त ही तरुणी मंत्रालयात आली होती. मात्र अचानक या तरुणीने मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याने खळबळ उडाली. चौथ्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर ही तरुणी पहिल्या मजल्यावरील संरक्षक जाळीवर पडल्याने तिचा जीव वाचला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर तरुणीला रुग्णालयात नेले आहे.
ही घटना घडल्यानंतर मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ही तरुणी संरक्षक जाळीवर विव्हळत असताना मंत्रालयाचे कर्मचारी मात्र बघ्याच्या भूमिकेत होते. काही लोक फोटो काढत होते, तर काहीजण व्हिडिओ शुटींग करत होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर तरुणीला संरक्षक जाळीतून बाहेर काढले. दरम्यान, सदर तरुणीच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागचे नेमके कारण समजू शकले नाही. ही तरुणी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. परंतु, ती नेमक्या कोणत्या कारणाने अस्वस्थ होती. मंत्रालयात ती कोणत्या कामासाठी आली होती. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
यापूर्वी मंत्रालयात दोन शिक्षकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अपंगांच्या शाळांना अनुदान मिळावे या मागणीसाठी या शिक्षकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. संरक्षक जाळ्यावर पडल्याने या दोन्ही शिक्षकांचा जीव वाचला होता. त्याआधी शेतकरी धर्मा पवार यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याची सरकारने गंभीर दखल घेऊन मंत्रालयात संरक्षक जाळ्या बसविल्या होत्या. त्यानंतरही मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या घटना घडतच आहेत.