नवीदिल्ली, वृत्तसंस्था | नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून पूर्वोत्तर राज्यांमध्ये चौथ्या दिवशीही हिंसाचार सुरूच आहे. गेल्या चार दिवसांपासून उसळलेल्या जनक्षोभाचे सावट जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर पडले आहे. शिंजो आबे भारताचा नियोजीत दौरा रद्द करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यात १५ ते १७ डिसेंबर दरम्यान द्विपक्षीय चर्चा होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी दिली होती. या भेटीचे ठिकाण जाहीर करण्यात आले नव्हते, पण गुवाहाटीमध्ये या भेटीसाठी जोरदार तयारी सुरू होती. मात्र, गुरूवारी माध्यमांशी बोलताना कुमार यांनी आमच्याकडे याबाबत सध्यातरी अपडेट नाहीयेत, अशी माहिती दिली. भेटीची जागा बदलवली जाईल का या प्रश्नाचे उत्तर देण्यास मी असमर्थ असल्याचेही कुमार म्हणाले.
दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर ईशान्य भारतातील स्थिती तणावपूर्ण बनली आहे. याची सर्वाधिक झळ आसामला पोहोचली असून, गुवाहाटीत संचारबंदी मोडून लोक रस्त्यावर उतरलेत. दिब्रुगडमध्ये आंदोलकांनी रेल्वे स्थानक पेटवले. गुवाहाटीत निदर्शनांदरम्यान दोन लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लखीमपूर, तिनसुकिया, धेमाजी, डिब्रूगड, कारेडियो, सिवसागर, जोरहाट, होलाहाट आणि कामरुप अशा १० जिल्ह्यांमध्ये मोबाईल सेवा बंद ठेवण्याचा कालावधी आणखी ४८ तासांनी वाढवण्यात आला आहे. त्रिपुरातील परिस्थितीही नियंत्रणाबाहेर गेली असून , पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन आंदोलकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला रात्री उशिरा मंजुरी दिली. राष्ट्रपतींनी सही केल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे.