नवी दिल्ली वृत्तसंस्था । एफएमसीजी क्षेत्रातील ‘नेस्ली इंडिया’ने ग्राहकांना जीएसटी कपातीचा लाभ देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी अडचणीत आली आहे. नॅशनल एंटी-प्रॉफिटिंग अथॉरिटीने नेस्ले इंडिया इंडस्ट्री ग्रुपला ग्राहक कल्याण निधीत ७३ कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
मागील दोन वर्षात जीएसटी कौन्सिलकडून अनेक उत्पादनांवरील जीएसटी दरात कपात करण्यात आली. मात्र या कर कपातीचा फायदा नेस्ले इंडियाने ग्राहकांना दिला नसल्याचे नॅशनल अँटी प्रॉफिटरिंग ऑथॉरिटीच्या निदर्शनात आले आहे. मात्र नेस्ले इंडियाने हा दावा फेटाळून लावला आहे. नेस्ले इंडियाने म्हटले आहे की, जीएसटी दरात झालेल्या आतापर्यंतच्या दर कपातीतून वस्तूंच्या किंमती कमी केल्या. त्याचा ग्राहकांना १९२ कोटींचा लाभ झाला असल्याचे नेस्ले इंडियाने म्हटले आहे. नेस्लेने वस्तूच्या किंमती कमी करून जीएसटी कपातीचा लाभ ग्राहकांना दिल्याचा पुरावा सापडला नसल्याचे नॅशनल अँटी प्रॉफिटरिंग ऑथॉरिटीने म्हटलं आहे. १९२ कोटींची आकडेवारी अयोग्य पद्धतीने सादर करण्यात आल्याचे ऑथॉरिटीने म्हटलं आहे. त्यामुळे १९२ कोटींचा जीएसटी कपातीचा लाभ ग्राहकांना देण्याचा नेस्लेचा दावा चुकीचा असल्याचे ऑथॉरिटीचे म्हणणे आहे. यावर नेस्ले इंडियाने या निकालाचा अभ्यास करून त्यावर निर्णय घेऊ असे म्हटले आहे.