जळगाव प्रतिनिधी । शहरातील काही पोलीस ठाण्यांसह अनेक ठिकाणी दत्त जयंतीनिमित्त आज (दि.११) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस आणि दत्त गुरु यांचे एक अतूट नाते असून पोलीस दत्तगुरुंना दैवत मानतात. म्हणूनच जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये दत्तगुरुंचे मंदिर असून दत्तजयंती निमित्त पोलीस ठाण्यात महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात येत असते.
शहरातील जिल्हापेठ, शहर, शनीपेठ व एमआयडीसी या पोलीस ठाण्यांमध्ये दत्त मंदिर आहे. तालुका पोलीस ठाण्याची नव्यानेच निर्मिती झाली आहे, त्यामुळे तेथे मंदिर नाही. रामानंद नगर पोलीस ठाणे भाड्याच्या जागेत असल्याने तेथेही मंदिर नाही. दत्तगुरुंना पोलीस दैवत मानतात, त्यामुळेच प्रत्येक पोलीस ठाण्यात दत्त मंदिर आहेच. असे मत बहुतेक पोलिसांनी आज व्यक्त केले. आज शहर पोलीस स्टेशन आणि जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शहरातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
भक्तीगीतांचा कार्यक्रम :- स्वामी समर्थ केंद्रात सायंकाळी कार्यक्रम दत्त जयंती महोत्सवानिमित्त आज श्री स्वामी समर्थ केंद्र प्रतापनगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात संध्याकाळी ४.३० ते ६.०० वाजेदरम्यान श्री स्वामी समर्थ केंद्र प्रतापनगर व स्वरवेध फाऊंडेशनतर्फे ‘तुझे नाम आले ओठी सुर भारावले’ हा दत्त प्रभू व स्वामी समर्थांवर आधारीत भक्तीगीतांचा कार्यक्रम होणार आहे. पं.संजय पत्की यांचे शिष्य परिवार भागवत पाटील व इतर गायक कलावंत सादर करणार आहे.
शहरातील सर्व स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) या ठिकाणी श्री दत्तजयंतीनिमित्त नाम जप यज्ञ सप्ताह सुरु आहे. यामध्ये सुरुवातीला ग्रामदेवता पूजन सन्मान करण्यात आला व नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भूपाळी आरतीनंतर प्रहर सेवा सुरु करण्यात आली. यानंतर अखंड दीपप्रज्वलन करून गुरुचरित्र पारायण सुरु करण्यात आले. या पारायणासाठी ६०० सेवेकरी प्रतापनगर केंद्र येथे बसलेले आहेत. रोज भूपाळी आरतीनंतर सामूहीक पारायणास सुरुवात होते व नंतर नित्य स्वाहाकार होतात. आज सकाळी १०.३० वाजता नैवेद्य आरती करण्यात आली. आरतीनंतर विष्णू सहस्त्रनाम वाचन, गीतेचा १५ वा अध्याय पठण तसेच गायत्री मंत्र, महामृत्यूंजय मंत्र, श्री स्वामी समर्थ मंत्र सामूहीक जप करण्यात आले. याशिवाय नित्य स्वाहाकार व बलीपुर्णाहुती कार्यक्रम होणार आहे. येथे दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. उद्या १२ डिसेंबरला सत्यदत्त पूजन, देवता विसर्जन होऊन सप्ताहाचे व गुरुचरित्र वाचनाने उत्सवाची समाप्ती होणार आहे.