मुंबई, वृत्तसंस्था | हैदराबाद येथील महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार आणि हत्त्या प्रकरणावर ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांनी संताप व्यक्त केला असून बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात माफी नसावी, असे मत व्यक्त केलं आहे. मात्र यावेळी त्यांनी आरोपींना मृत्यूची नाही तर जन्मठेपेची शिक्षा दिली जावी असेही सांगितले आहे.
वहिदा यांना यासंबंधी विचारण्यात आले असता त्यांनी म्हटले की, “बलात्कारासारखा गुन्हा माफीच्या लायक नाही. पण तरीही मला वाटते, एखाद्याची हत्या करण्याचा अधिकार आपल्याला नाही. बलात्काऱ्याला मरेपर्यंत जन्मठेप दिली आहे. आयुष्यभर त्यांना कारागृहात डांबून ठेवले पाहिजे”. जर आरोपींना रंगेहात पकडण्यात आले असले तर कोणताही खटला चालवण्याची गरज नाही, असेही यावेळी त्यांनी म्हटले. “जर कुणाला रंगेहात पकडले असेल तर खटल्याची गरजच काय ? तुम्ही जनतेचा पैसा वाया घालवत आहात,” असे मतही त्यांनी व्यक्त केले.