मुंबई प्रतिनिधी । अजित पवार यांनी आपण काकांशी अर्थात शरद पवारांशी बोललो असल्याचे सांगितल्यामुळे त्यांच्या सोबत सरकार स्थापन केल्याचा गौप्यस्फोट आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी भल्या पहाटेच अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. यानंतरच्या घटनाक्रमात या दोन्ही मान्यवरांना राजीनामा द्यावा लागला असून आता महाआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. या पार्श्वभूमिवर, आज देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत या प्रकरणाबद्दल पहिल्यांदाच भाष्य केले आहे. ते म्हणाले की, काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सरकार चालवणं शक्य नाही. भाजपसोबतच सरकार स्थापन केलं पाहिजे, असं मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगितलं आहे. शरद पवार यांना या गोष्टीची कल्पना दिली आहे, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यामुळेच आम्ही त्यांच्यासोबत सत्तास्थापन केली होती. अजित पवार यांनी आपले अनेक आमदारांशी मोबाईलवरून बोलणेदेखील करून दिले होते अशी माहितीदेखील त्यांनी दिली.