केरळ (वृत्तसंस्था) देशाच्या अर्थमंत्र्यांना कांदयाच्या वाढलेल्या दरांविषयी विचारले जाते. त्यावर अर्थमंत्री उद्दामपणे मी कांदा आणि लसूण खात नाही, असे उत्तर देतात. मुळात अर्थमंत्र्यांना आपल्या सभोवताली काय सुरू आहे, हेच कळेनासे झाले आहे. कारण, अर्थमंत्रीपदासाठी त्या अकार्यक्षम आहेत, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली आहे. ते गुरुवारी केरळमधील एका कार्यक्रमात बोलत होते.
देशातील कांद्याच्या वाढलेल्या दरासंदर्भात बुधवारी लोकसभेत चर्चा सुरु असताना निर्मला सीतारामन यांनी वादग्रस्त विधान केले होते. माझ्या घरात कांदा-लसूण फार प्रमाणात वापरत नाहीत. त्यामुळे माझा कांद्याशी फार संबंध नाही, असे त्यांनी म्हटले होते. हाच मुद्दा धरून राहुल गांधी यांनी गुरुवारी निर्मला सीतारामन यांच्यावर टीकास्त्र सोडले. तुम्ही काय खाता याबद्दल देशाला सांगणे, हे अर्थमंत्र्यांचे काम नसते. निर्मला सीतारामन या अर्थमंत्री म्हणून अकार्यक्षम आहेत. याउलट यूपीएच्या काळात अर्थव्यवस्थेची सूत्रे कायम सक्षम लोकांकडेच होती. यूपीए सरकारने १०-१५ वर्षांच्या काळात अर्थव्यवस्थेची उत्तम बांधणी केली,असेही राहुल गांधी होते.