जळगाव प्रतिनिधी । स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर आयोजित व जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड, युनियन बँक ऑफ इंडिया, संस्कृती मंत्रालय नवी दिल्ली, भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, जाई काजळ, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, पु.ना. गाडगीळ अँड सन्स, प्रायोजित अठराव्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दि. ३, ४, व ५ जानेवारी रोजी छत्रपती शाहू महाराज बंदिस्त नाट्यगृहात करण्यात आले आहे.
या महोत्सवास जळगाव जनता सहकारी बँक यांचेही सहकार्य लाभत आहे. या वर्षीच्या या १८ व्या बालगंधर्व महोत्सवात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय युवा व प्रतिथयश कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी या निमित्ताने प्रतिष्ठानने दिलेली आहे. स्व. पं. वसंतराव चांदोरकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने आयोजित अठरावा बालगंधर्व संगीत महोत्सवाचे महत्व यावेळी अधोरेखित होत आहे. जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने एक सुंदर अशी स्मरणिका या महोत्सवात प्रकाशित करण्यात येणार आहे.
यांची असणार विशेष उपस्थितीत :-
या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ दि. 3 जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजता होणार आहे. या उद्घाटन समारंभास पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे पदाधिकारी अशोक जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड तसेच जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे शहराचे महापौर सीमा भोळे, मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे तसेच नवनिर्वाचित जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, जळगाव जनता सहकारी बैंकचे अध्यक्ष अनिल राव, युनियन बँकेचे महाव्यवस्थापक एम.व्यंकटेश, स्टेट बैंक ऑफ इंडियाचे शाखा प्रबंधक अशोक सोनोने, जाई काजळचे राजेश गाडगीळ, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे पदाधिकारी बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक महाबळेश्वरकर हे उपस्थित राहणार आहेत.
पहिल्या दिनाचे सत्र :-
उद्घाटन समारंभाआधी डॉ. अपर्णा भट आणि त्यांच्या शिश्या तर्फे गुरुवंदना सादर केली जाईल. तिन्ही दिवस प्रतिष्ठानचे कलावंत नांदी सादर करतील आणि लगेच प्रथम दिनाच्या प्रथम सत्राची सुरुवात करण्यात येणार आहे. अठराव्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या प्रथम दिनाचे प्रथम सत्र युवा कलाकार सारेगम फेम विश्वजीत बोरवणकर गाजवणार आहे. त्यानंतरचे दुसरे सत्र युवा कलाकार आणि सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलेली मुग्धा वैशंपायन सादर करणार आहे.
दुसऱ्या दिनाचे सत्र :-
द्वितीय दिनाचे प्रथम सत्रात प्रख्यात नर्तक पंडित गोपीकृष्ण यांचे नातू विशाल कृष्ण आपल्या पदन्यासतून जळगावकर रसिकांवर मोहिनी घालणार आहेत. द्वितीय सत्रात सुपरिचित तबलावादक पंडित किशन महाराज यांचे नातू पंडित शुभ महाराज व प्रख्यात पखवाज वादक पंडित प्रतापराव पाटील यांची तबला व पखवाज जुगलबंदीने या सत्राची सांगता होईल. युवा पिढीचे आश्वासक वादक संदीप मिश्रा हे या जुगलबंदीला सारंगीची साथ करतील.
तिसऱ्या दिनाचे सत्र :-
तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात अत्यंत उमद्या अशा जागतिक ख्यातीच्या पंडिता देवका पडित या आपल शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सादर करतील. अठराव्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप राष्टीय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावत उस्ताद शाहाद परवज्ञ खान यांच्या सतार वादनाने होईल.
प्रयोजकांतर्फे आवाहन :-
जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित १८ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे तीनही दिवसाचे सूत्रसंचालन सुसंवादीनी मंगला खाडिलकर या करतील. संपूर्ण भारतासह जगभरात प्रसिद्ध पावलेला आणि जळगावचे नाव जागतिक सांस्कृतिक क्षेत्रात नेणारा खानदेशचा सांस्कृतिक मानदंड म्हणजे बालगंधर्व संगीत महोत्सव. आणि तमाम जळगावकर रसिकांना स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर यांच्यासह सर्व प्रायोजकांतर्फे असे आव्हान करण्यात येते की, चुकवू नये असा हा महोत्सव असून नवीन वर्षाच्या सांगितीक शुभेच्छा तमाम जळगावकर रसिकांना देण्यासाठी हा महोत्सव प्रतिष्ठान आयोजित करीत असते. रसिकांनी याचा लाभ घ्यावा, अशी विनंती प्रतिष्ठानासह सर्व प्रयोजकांनी केली आहे.