मुंबई प्रतिनिधी । अजित पवार नव्हे तर जयंत पाटील यांची राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून विधीमंडळाच्या रेकॉर्डवर नोंद करण्यात आल्याने ते व्हिप बजावू शकत नसल्याची माहिती आता समोर आली आहे.
अजित पवार यांना आधी राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून निवडण्यात आले होते. आमदारांच्या पाठींब्यांची पत्रे त्यांच्याच कडे सुपुर्द करण्यात आली होती. हीच पत्रे भाजपला देऊन त्यांनी उपमुख्यमंत्रीपद पटकावल्याचे मानले जात आहे. यामुळे धक्का बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना व्हिप बजावण्याचे अधिकार प्रदान करून याची माहिती विधीमंडळाकडे देण्यात आली. राष्ट्रवादीचा हा दावा ग्राह्य धरून त्यांची विधानसभेच्या रेकॉर्डवर गटनेते म्हणून नोंद करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्याने दिली आहे. यावरून झी-२४ तास या वाहिनीने वृत्त दिले आहे. अर्थात, आता अजित पवार नव्हे तर जयंत पाटील यांचा व्हिप ग्राह्य धरला जाणार असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमिवर, आज न्यायालय नेमका काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.