नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने अयोध्या प्रकरणी दिलेल्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाचे सचिव जफरयाब जिलानी यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली.
जमीयत उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना अर्शद मदानी यांनी या बैठकीनंतर अयोध्या प्रकरणात आमची ही याचिका १०० टक्के फेटाळली जाईल हे आम्हाला माहीत आहे, मात्र घटनापीठाच्या निर्णयाला आव्हान देत पुनर्विचार याचिका दाखल करणे हा आमचा हक्क असल्याचेही ते म्हणाले. तसेच सुप्रीम कोर्टाने मशीदीसाठी देऊ केलेली पाच एकर जमीन घेणार नाही, असाही निर्णय बोर्डाने केला आहे. अयोध्या प्रकरणी आपला निर्णय देताना सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने वादग्रस्त जागा राम मंदिर न्यासाची असून मशीद निर्मितीसाठी अयोध्येत पाच एकर जागा देण्याच आदेश दिले होते. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव जिलानी यांनी या निर्णयात विरोधाभास असून मुस्लिमांनी मशीदीच्या बदल्यात कोणतीही जमीन घेऊ नये असे बैठकीनंतर म्हटले आहे. घटनापीठाच्या अयोध्या प्रकरणावरील निकालामध्ये अनेक अंतर्विरोध असल्याचेही मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने म्हटले आहे. जर बाहेरून रामाची मूर्ती आणून आत ठेवली गेली असेल, तर त्याला देव कसे मानता येईल, असेही बोर्डाचे म्हणणे आहे.