चाळीसगाव (प्रतिनिधी) अलिकडे नोकरी,उद्योग व्यवसायातला तणाव ,मुलांच्या शिक्षणापासून तर त्यांच्या करीअरविषयी, कुटूंबातील इतर सदस्यांच्या आजारपणापासून तर कौटुंबिक समस्यांचा तणाव, अशा अनेक ताणतणावांनी घराघरातले आयुष्य फारच बिघडत असून हे ताणच अनेक आजारांना जबाबदार आहे. त्यामुळे आजच्या घडीला संतुलित आहारासोबतच तणावमुक्त जीवनशैली हेच निरोगी आयुष्याचे रहस्य, असल्याचे प्रतिपादन डॉ.विनोद कोतकर यांनी केले. आई फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थावरून बोलत होते.
आई फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आहार स्पेशलिस्ट अर्थात डायटिशिअन दिव्या रावलानी व कोमल गोपलानी या दोघांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. अलिकडे घराघरात मधुमेह व रक्तदाबाचे रुग्ण असण्याचे कारण मुळात आपला बदललेला आहार व व्यायामाचा अभाव हे असून त्यासाठीच या आहारविषयक मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याचे आई फाऊंडेशनच्या सचिव डॉ.चेतना कोतकर यांनी सांगितले. कोमल गोपलानी यांनी मधुमेहाचे दोन प्रकार समजावून सांगताना आहारातील गोड पदार्थासोबतच चरबीयुक्त पदार्थदेखील तेवढेच टाळले पाहीजेत, असा सल्ला देवून तंतूमय आहार घेतल्याने पोट साफ होवून बऱ्याच आजारापासून आपली सुटका होवू शकते असे सांगितले.
दिव्या रावलानी यांनी योग्य आहारासोबतच सकाळी ३/४ किलोमीटर फिरणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. रक्तदाब व मधुमेह हे दोन्हीही आजार आपल्या वैयक्तिक आयुष्याकडे दुर्लक्ष झाल्याचेच फळ आहे, असे सांगून स्वताकडे लक्ष द्यायला सुरुवात करा असे आवाहन केले. यावेळी जवळपास ७८ महिलांची रक्तातील साखरेची तपासणी मनोहर सोनवणे यांनी अल्पदरात करुन दिली. आई फाऊंडेशनचे सामाजिक जनप्रबोधनाचे कार्यक्रम अखंडपणे चालू असल्याने आम्हा माता भगिनींना अनेक समस्यांपासून दूर राहता येते याबद्दल उपस्थित महिलांनी फाऊंडेशनचे आभार मानले.