जळगाव प्रतिनिधी । खासगी वैद्यकीय सेवा अतिशय महाग झालेली असतांना शहरातील जळगाव पीपल्स बँकेच्या स्व. रामदास पाटील स्मृती सेवा संस्थेने चालवलेल्या छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात अत्यल्प मूल्यात अत्याधुनिक सेवा प्रदान करण्यात येत आहे.
जळगाव पीपल्स बँक संचलीत स्व. रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्टने हाती घेतलेल्या महापालिकेच्या जळगाव पब्लिक स्कूल व छत्रपती शाहू महाराज रुग्णालय या संस्थांचा कायापालट झाला आहे. ट्रस्टचे चेअरमन प्रकाशजी चौबे यांच्या अध्यक्षतेखाली या संस्था वेगाने प्रगती पथावर आहेत. याबाबत लाईव्ह ट्रेंडस न्यूजने श्री. प्रकाश चौबे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख उलगडून दाखविले. ते म्हणाले की, जळगाव पब्लिक स्कूलमध्ये गरीब कुटुंबातील मुलांना उच्च प्रतीचे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेण्याची संधी मिळत आहे, तसेच येथे विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांनाही प्रशिक्षित करण्याचे महत्वाचे कार्य केले जात आहे.
तर महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयाने अक्षरशः कात टाकली आहे. शहरातील आयएसओ ९००१ हे मानांकन प्राप्त करणारे हे एकमेव रुग्णालय आहे. रुग्णांना अत्यंत स्वस्त दारात उत्तम दर्जाची आरोग्य सेवा येथे पुरवली जात आहे. रुग्णालयातील स्वच्छता उल्लेखनीय असून प्रत्येक विभागातील तज्ञ डॉक्टर तेथे सेवा देण्यासाठी तत्परतेने उपलब्ध आहेत. रुग्णांवर उपचारासोबतच अद्ययावत आय.सी.यु., एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, वेगवेगळ्या लहान-मोठ्या ऑपरेशन्ससाठी चार स्वतंत्र ऑपरेशन थिएटर्स येथे उपलब्ध आहेत. रुग्णांना संपूर्ण आरोग्य तपासणीची महागडी सुविधा येथे केवळ एक हजार रुपयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच फॅमिली हेल्थ क्लब या आरोग्य सुविधेअंतर्गत सभासद होणार्या कुटुंबांना आणखी १० टक्के सवलतीच्या दरात येथील आरोग्य सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या रुग्णालयात लवकरात लवकर सगळ्या शासकीय योजनांचा लाभ गरजू रुग्णांना मिळावा, यासाठी ट्रस्ट प्रयत्नशील आहे. शहरातील गरजू विद्यार्थी आणि रुग्णांनी या सुविधांचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकाश चौबे यांनी केले आहे.
जळगाव पीपल्स बँकेने सामाजिक ऋणातून उतराई होण्यासाठी जळगाव पीपल्स बँक स्व. रामदास पाटील स्मृती सेवा या संस्थेच्या माध्यमातून अनेक जनहितार्थ उपक्रम राबविले आहेत. यातील शाहू महाराज रूग्णालयाला महापालिकेकडून चालविण्यासाठी घेतले असून याचा अक्षरश: कायापालट करण्यात आला आहे. अत्यंत महागड्या अशा विविध उपचारांना येथे ना-नफा ना-तोटा या तत्वावर अतिशय माफक दरात सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. यात फक्त १००० रूपयात संपूर्ण शरिराचे चेकअप करण्यात येत असून याचा लाभ अनेक जळगावकर घेत आहेत. बाहेर याच चाचणीचे सुमारे पाच हजार रूपये लागतात हे विशेष. सध्या येथे शासकीय योजना नसल्या तरी येत्या काही दिवसांमध्ये सर्व योजना लागू करण्यात येणार असल्याची माहितीसुध्दा प्रकाश चौबे यांनी दिली.
पहा:– प्रकाश चौबे यांच्या मुलाखतीचा विस्तृत व्हिडीओ.