अहमदाबाद (वृत्तसंस्था) दोन महिन्यापासून लाईट बिल न भरल्यामुळे घराचा विद्युत पुरवठा खंडित होता. तशात रात्रभर मच्छर झोपू देत नव्हते. रोजच्या त्रासाला कंटाळून एका पत्नीने आपल्या पतीला बेदम मारहाण केल्याची घटना गुजरातमधील अहमदाबाद शहरात ही घटना घडली आहे. भूपेंद्र लेउया असे पीडित व्यक्तीचे नाव असून पत्नीने केलेल्या मारहाणीत त्याच्या उजव्या डोळ्यावर सात टाके पडले आहेत.
गुजरातमधील अहमदाबाद शहरात भूपेंद्र लेउया हा आपली पत्नी आणि मुलीसह राहतो. भूपेंद्र काही महिन्यांपासून त्याच्या कारमधून एलइडीची विक्री करतो त्यामुळं त्याचं आर्थिक उत्पन्न कमी आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो वीजबिल भरु न शकल्यामुळे त्याच्या घरातील वीज कापण्यात आली होती. बुधवारी सकाळी भूपेंद्रची पत्नी संगीताने पंखा बंद असल्यामुळे रात्री खूप मच्छर चावल्याने व्यवस्थित झोप झाली नसल्याची तक्रार भूपेंद्रकडे केली. यावर भूपेंद्रने गमंतीने माझ्या बिछान्यावर येऊन झोपली असतीस तर चांगली झोप लागली असती, असे उत्तर दिले. यावर चिडलेल्या संगीताने त्याला मुसळीने मारहाण केली. पीडित व्यक्तीचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी त्याच्या भावाला महेंद्रला बोलावले तेव्हा त्याची या सगळ्यातून सुटका झाली. दरम्यान, या मारहाणीत भूपेंद्रच्या उजव्या डोळ्यावर सात टाके पडले आहेत. पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.