


मुंबई (वृत्तसंस्था) राज्यपालांकडून शिवेसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिल्यानंतर राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दुसरीकडे केंद्रातील एनडीए सरकारमधूनही शिवसेना बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. खुद्द केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवलेली आहे.
भाजपाकडून राज्यपालांची भेट घेऊन असमर्थता दर्शवण्यात आल्यानंतर आता नव्या राजकीय समीकरणांनी जोर धरला आहे. भाजपानंतर दुसऱ्या क्रमांचा मोठा पक्ष असेलेल्या शिवेसेनेला राज्यपालांकडून सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले गेले. मात्र स्वबळावर सत्ता स्थापन करणे शिवसेनेला शक्य नसल्याने अशा परिस्थिती काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेला महत्व प्राप्त झाले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी पक्षाची सध्याची भूमिका स्पष्ट केली आहे. शिवाय शिवसेनेने अशा परिस्थिती भाजपाशी नातं तोडायला हवं व केंद्रातील एनडीए सरकारमधूनही बाहेर पडायला हवं, असे माध्यमांशी बोलताना म्हटले होते. यावर केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता एनडीए सरकारमधूनही शिवसेना बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.तर अरविंद सावंत उद्या राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे.


