अनेर परिसरातील केळी बागा उद्ध्वस्त

sheti nuksan

चोपडा प्रतिनिधी । तालुक्याच्या पश्‍चीम भागातील अनेर व तापी नदीकाठावरील गावांना वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने झोडपल्याने केळी बागा उद्ध्वस्त झाल्या असून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्याच्या पश्‍चिम भागातील अनेर व तापी नदीच्या काठावर असलेल्या आठ ते दहा गावांना गुरूवारी वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. वादळी वार्‍यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्याचे वृत्त आहे.मुसळधार पाऊस व वादळामुळे शेतकर्‍यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा फुटल्या आहेत. अनेर व तापी नदीच्या काठावरील अनेक गावांमध्ये वादळामुळे विजेच्या तारा तुटल्यामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.

चोपडा तालुक्यातील अनेर व तापी नदी काठावरील गलंगी,वेळोदे,घोडगाव, कुसुंबा, दगडी,अनवर्दे,वाळकी विटनेर,मोहिदा, वढोदा, अजंतीसिम परिसरात आज ७ रोजी गुरुवारी दुपारी ४ : ३० ते ५ : ३० वाजेच्या सुमारास एक तासभर जोरदार वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले.वादळ व पावसामुळे केळी व पपईच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत.तसेच कापूस,मका,तूर पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने पिके वाया गेली आहेत.वादळी वार्‍यांमुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडले तर विजेच्या तारांवर झाड पडल्याने वाढोदा सह अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.एक तास मुसळधार पावसामुळे ओढे,नदी,नाले पाण्याने तुडुंब भरून ओसंडत होते.विटनेर येथील शेतकरी भरत ईश्‍वर चौधरी,रमेश रामदास पाटील,रवींद्र वासुदेव पाटील,जगदीश प्रताप चौधरी,डिगंबर पाटील यांचेसह आदी शेतकर्‍यांच्या कापणीवर आलेल्या केळी व पपईच्या बागा वादळी वार्‍यामुळे जमीनदोस्त झाल्याचे वृत्त आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून तालुक्याच्या पश्‍चिम भागातील अनेर व तापी पट्टयातील परिसरात जोरदार पाऊस होत असल्याने शेती शिवारात पाणी साचले आहे.शेतातील बांध फुटून नुकसान झाले आहे.उभ्या पिकात पाणी शिरल्याने बर्‍याच ठिकाणची शेतजमीन वाहून गेली आहे.दररोज पडणार्‍या पावसाने खरीप पिके आधीच वाया गेली असून गुरूवारी तासभर झालेल्या वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने अनेर परिसराला अक्षरशः झोडपून काढले आहे. वादळ व मुसळधार पावसामुळे केळी व पपई च्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत.तसेच शेतात उभे असलेले कापूस,मका,तूर पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने सर्वच पिके वाया गेली आहेत.

Protected Content