मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचा निर्णय आता महाराष्ट्रच घेईल. सध्या आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलो तरी मुख्यमंत्री मात्र, शिवसेनेचाच होणार असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते.
शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत दररोज पत्रकारपरिषद घेऊन भाजपला नवनवे इशारे देत आहेत. आजच्या पत्रकारपरिषदेतही त्यांनी शिवसेनेची भूमिका आक्रमकपणे मांडली. महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाचा प्रमुख नेता हालचाली करत आहे. सत्तास्थापनेत केवळ एकाच पक्षाची भूमिका असल्याचे चित्र आता बदलले आहे. कारण, यंदा प्रत्येक पक्षाची, एवढेच काय अपक्षही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शिवसेनेच्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार. लवकरच नव्या सरकारचा शपथग्रहण सोहळा होणार असून शपथग्रहण ही कुणाची मक्तेदारी नाही, ग्रहण लागले आहे ते आता सुटणार आहे, असे सांगत राऊत यांनी नाव न घेता भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे. लवकरच राज्याच नवे सरकार स्थापन होईल आणि ते सरकार राज्यातील जनतेच्या मनाप्रमाणे स्थापन होईल, त्यानंतर राज्याचा चेहरामोहराच बदलणार असल्याचेही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना राऊत म्हणाले.