जळगाव प्रतिनिधी । आपण राजकारणात कधीही कुणाचा आकस धरला नसून आपले विरोधक सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांच्यासोबत बाळासाहेबांना भेटलो होतो असा गौप्यस्फोट आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला.
एकनाथराव खडसे यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारीक गप्पा केल्या. यात त्यांनी कोणतेही राजकीय भाष्य केले नाही. मात्र त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी उपस्थितांना सुरेशदादा जैन यांचा विषय काढला. यावर खडसे म्हणाले की, सुरेशदादांशी आपले टोकाचे विरोध होते. आम्हा दोन्हींमध्ये प्रचंड वैमनस्य असतांनाही जिल्ह्याच्या विकासाचा प्रश्न जिथे येईल तिथे आम्ही सोबत होतो. १९९८च्या सुमारास युती सरकार असतांना सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्री करावे यासाठी मी स्वत: दादांसोबत बाळासाहेब ठाकरे यांना मातोश्रीवर भेटलो होते. तेव्हाच बाळासाहेबांनी एका क्षणात आपण व्यापार्याच्या हातात महाराष्ट्राची धुरा देणार नसल्याचे ताडकन सांगितले. यामुळे दादा आणि आपल्यात वाद असले तरी विकासावर आम्ही एकत्र होतो आणि राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, नाथाभाऊंनी याप्रसंगी आपले तिकिट नेमके कसे कापले गेले याचा जाब पक्षाला विचारणार असल्याचेही सांगितले. तर उत्तर महाराष्ट्रात पक्षाला अपेक्षित यश का मिळाले नाही असा सवालदेखील उपस्थित केला.