जळगाव ( प्रतिनिधी) शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनात जैन उद्योग समूहाचे अनमोल कार्य असून त्यांनी उद्योग समूह वाढवताना भूमिपुत्रांना रोजगार देण्यास प्राधान्य दिले आहे, देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास डॉ. भवरलालजी जैन यांचे कार्य नोंद घेण्यासारखे आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कल्याण येथील उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्यावतीने जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांचा ‘खान्देश उद्योग रत्न’ या पुरस्काराने गौरव करण्यात आला.
मानपत्र, स्मृतिचिन्ह असे स्वरूप असलेला पुरस्कार कल्याण आणि पंचक्रोशीतील हजारो खान्देशवासीयांच्या साक्षीने अशोक जैन यांनी स्विकारला. अशोक जैन यांनी सत्काराच्या मनोगतात सांगितले की शेती, शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून डॉ. भवरलालजी जैन यांनी कंपनीचा मुहुर्तमेढ रोवली. त्यांचे संस्कार आणि शिकवण घेऊन जैन इरिगेशन या कंपनीची वाटचाल सुरु आहे. कर्मभूमीशी नाळ घट्ट रहावी यासाठीच कंपनीने मुख्यालय जळगाव येथे ठेऊन जगभरात शाखा केल्या आहेत. प्रामाणिकपणा, सचोटी आणि समाजासाठी कायम देत रहावं, हे जैन उद्योग समूहाच्या यशस्वी वाटचालीतील महत्त्वाचे दुवे आहेत. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कायम हास्य रहावे, यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगीतले. मनोगतात जैन परिवाराचा इतिहास व वाटचाल तसेच कान्हदेशच्या भूमीचे वैशिष्ट्य सांगितले. उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या खान्देश भवनासाठी अशोक जैन यांनी भरघोस निधी जाहिर केला. यावेळी या कार्यक्रमात नामदार दादा भुसे, आमदार निरंजन डावखरे, आमदार गणपत गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील, पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक, कल्याण व पंचक्रोशीतील हजारो खान्देशवासिय उपस्थित होते.