भुसावळ प्रतिनिधी । भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामूहिक हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. कधी काळी भुसावळ आणि गुन्हेगारी हे समीकरण रूढ झाले होते. काळाच्या ओघात ही ओळख बदलली. मात्र कालच्या सामुहिक हत्याकांडाच्या भयंकर घटनेने या शहरावर पुन्हा एकदा कलंक लागला आहे. यातून भुसावळ हे पुन्हा एकदा गुन्हेगारांची राजधानी बनली आहे का ? याचे नेमके काय परिणाम होणार? या अतिशय ज्वलंत प्रश्नावर ‘लाईव्ह ट्रेंडस् न्यूज’च्या माध्यमातून चर्चा करण्यात आली. यात गत अनेक वर्षांपासून गुन्हेगारीच्या अंतरंगाची अतिशय जवळून माहिती असणार्या ज्येष्ठ पत्रकारांना या संवेदनशील विषयावर बोलते केले. या चर्चेत गुन्हेगारी पॅटर्न चिंताजनक असल्याचा सूर सर्व पत्रकारांनी व्यक्त केला.
या चर्चासत्रात सहभागी झाले आहेत, ‘लाईव्ह ट्रेंडस् न्यूज’चे संपादक शेखर पाटील, सकाळचे ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण, पुण्यनगरीचे प्रतिनिधी शेख सत्तार, देशोन्नतीचे कार्यालय प्रमुख प्रेम परदेशी, लोकशाहीच्या उज्ज्वला बागूल, लाईव्ह ट्रेंडस् न्यूजचे प्रतिनिधी संतोष शेलोडे, बातमीदारचे निलेश फिरके,दैनिक भास्करचे अभिजीत आढाव,ईबीएमचे सतीश कांबळे तर सूत्रसंचालन करत आहेत कार्यकारी संपादक विजय वाघमारे.