नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून झाडाझडती, चौकशीचे तीन टप्पे होणार आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात तक्रारदार आणि बँक अधिकाऱ्यांसह काही साखर कारखानदारांची तर दुसऱ्या टप्प्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तर शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची चौकशी होणार असल्याचे कळते.
शरद पवार यांच्यावरही ईडीकडून गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यासोबत पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह 70 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने मनी लाँडरिंग अर्थात पैशाची अफरातफर/आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, 25 हजार कोटी रुपयांच्या कथित राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणाची चौकशी तीन टप्प्यात होणार असल्याचे कळते. पहिल्या टप्प्यात तक्रारदार आणि बँक अधिकाऱ्यांसह काही साखर कारखानदारांची चौकशी ईडीकडून होऊ शकते. तपासाच्या दुसऱ्या टप्प्यात अजित पवार यांना चौकशीला बोलावले जाण्याची शक्यता आहे. तर तिसऱ्या टप्प्यात खुद्द शरद पवारांना चौकशीसाठी पाचारण केले जाऊ शकते.