बेंगळुरू, वृत्तसंस्था | भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) सोडलेल्या ‘चांद्रयान-२’ मधील ‘विक्रम’ लँडरशी संपर्काची आशा पुरती मावळली आहे. ‘इस्रो’ प्रमुख के. सिवन यांनी अधिकृतरित्या तसे जाहीर केले असून मिशन ‘गगनयान’वर आम्ही आता लक्ष केंद्रीत केले आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे.
‘इस्रो’ने सोडलेल्या ‘विक्रम’ लँडरचे आयुष्य चंद्रावरील कालगणनेनुसार एका दिवसाचे (पृथ्वीवरील कालगणेनुसार १४ दिवसांचे) होते. ७ सप्टेंबर रोजी चांद्रभूमीवर आदळलेल्या ‘विक्रम’चा जीवनकाळ शनिवारी, म्हणजेच २१ सप्टेंबर रोजी पूर्ण झाला. त्यामुळे ‘विक्रम’शी संपर्क साधण्याच्या सर्व आशा आता मावळल्या आहेत, असे सिवन यांनी स्पष्ट केले आहे. आमचे प्राधान्य आता ‘गगनयान’ला असेल, असे त्यांनी म्ह्टले आहे.
ऑर्बिटरचे कार्य उत्तम :- ‘विक्रम’चे काम संपले असले तरी चांद्रयान-२ मधील ऑर्बिटर उत्तम काम करत आहे. त्यातील सर्वच्या सर्व आठ उपकरणे सुरू आहेत. त्यांनी फोटो पाठवणे सुरू केले असून संशोधक त्याचा अभ्यासही करत आहेत. ऑर्बिटरचा अपेक्षित कार्यकाळ एक वर्षांचा आहे. मात्र, त्यातील अतिरिक्त इंधनामुळे तो सुमारे सात वर्षे काम करू शकतो, असेही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.