जळगाव प्रतिनिधी । राज्य विधीसेवा प्राधिकरणाच्या उपक्रमाअंतर्गत फिरते विधीसेवा व लोकअदालत योजनेस नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे. याद्वारे नागरिकांच्या घराजवळच न्यायालय उपलब्ध होणार असून, यातील लोकअदालतीत नागरिकांना तेथेच आपले खटले दाखल करता येणार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा न्यायालयाच्या आवारात या उपक्रमांतर्गत फिरत्या न्यायालयाचे उद्घाटन सोमवारी (दि.16) रोजी सकाळी करण्यात आले असून प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील जिल्हा विधीसेवा प्राधिकरण व वकील संघांच्या संयुक्त विद्यमाने 16 ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे. जळगाव शहर व जिल्ह्यातील सर्व तालुकांमधील विधीसेवा समिती व इतर तालुका न्यायालयाच्या ठिकाणी जाऊन लोकअदालत व कायदेविषयक शिबिर घेणार आहे. तरी नागरिकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजन केलेल्या फिरते न्यायालयाचा लाभ घेवून आपल्या प्रलंबित प्रकरणे तडजोड करुन वेळ व पैशाची बचत करावी, असे आवाहन विधी सेवा उप-समिती, उच्च न्यायालय आणि जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांनी केले आहे.