नवी दिल्ली वृत्तसंस्था । रशिया येथे वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये चार भारतीय बॉक्सर वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीपच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमित पानघळने ५३ किलोग्रॅम वजनी गटाच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये तुर्कीच्या बातुहान सिटफीला ५-०ने पराभूत करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. आता अमितचा पुढचा मुकाबला फिलिपाइन्सच्या कार्लो पालामशी होणार आहे. गेल्या वर्षी आशियाई बॉक्सिंग स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये अमितने पालामला पराभूत केलं होतं. २०१७मध्ये अमितने क्वार्टर फायनलपर्यंत धडक दिली होती. दुसरीकडे ६३ किलो वजनी गटात मनिष कौशिकने मंगोलियाच्या चिनजोरिग बातारसुखचा ५-०ने पराभव केला आहे. चिनजोरिगने आशियाई स्पर्धेत रजत पदक जिंकलेलं आहे. त्याने आशियाई चॅम्पियनशीपमध्ये दोनदा पदकही मिळविलं आहे. तर संजितने उज्बेकिस्तानच्या संजार तुरसुनोवचा ४-१ पराभव केला आहे. या चारही खेळाडूंनी हा सामना जिंकल्यास त्यांच्या खात्यात किमान ब्राँझ पदक तरी जमा होणार आहे.