चोपडा लतीश जैन । चोपडा शहराच्या पाणी पुरवठा योजनेचे काम जलद गतीने सुरू असून २०५० पर्यंत सुरळीतपणे पाणी पुरवठा होऊ शकेल असे नियोजन असल्याची माहिती नगराध्यक्षा मनीषाताई चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा मनिषाताई चौधरी व गटनेते जीवन चौधरी यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी त्या म्हणाल्या की, शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शासनाने २०१८मध्ये गूळ धरणावरून ६५ कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून गूळ धरण ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत चौदा किलोमीटरची अंतराची पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. नवीन जलवाहिनीचे काम दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण असल्याने कुठल्याही प्रकारची नादुरुस्ती वा गळती झाली नाही. तसेच चाचणी न घेता देखील पाणी सुरळीतपणे जलशुद्धीकरण केंद्रात आले. नवीन पाणीपुरवठा योजनेची उर्वरित कामे जलदगतीने सुरु आहेत. नगरपालिकेने दोन हजार पन्नासपर्यंत लोकसंख्येवर आधारित दरडोई १३५लिटर प्रमाणे पाण्याचे नियोजन केले आहे. तसेच नवीन पाणीपुरवठा योजना दोन हजार वीस अखेर पूर्ण होऊन शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
नगराध्यक्षा मनीषाताई पुढे म्हणाल्या की, चोपडा शहराच्या ६५ हजार लोकसंख्येसाठी १९९० मध्ये तापी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती त्यात पाइपलाइन व कठोरा पंपिंग स्टेशन सह १०५० दशलक्ष लिटर क्षमता असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचा समावेश होता. शहराची लोकसंख्या ६५ हजार असून २०५०मध्ये १ लाख ३५हजार पर्यंत पोहोचणार आहे. लोकसंख्येनुसार दरडोई १३५ लिटर पाणी देणे गरजेचे आहे. यासाठी २०१७ मध्ये शासनाकडे नवीन वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यास २०१८ मध्ये शासनाची मंजुरी मिळाली. योजना लवकरच कार्यान्वित होण्यासाठी जलद गतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊन तीन पाणीपुरवठा योजनेला २३मे२०१८ च्या सर्वसाधारण सभेत मान्यता घेऊन कार्यारंभ आदेश देण्यात आले. दरम्यान बबन तडवी यांची बदली होऊन अविनाश गांगोडे नवीन मुख्य अधिकारी म्हणून रुजू झाले. पाणीपुरवठा योजनेच्या शासन स्तरावर पाठपुरावा केल्याने वनविभागाची परवानगी मिळाल्यामुळे योजनेच्या कामाला गती मिळून एप्रिल महिन्यात गूळधरण ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत चौदा किलोमीटर पाइपलाइन टाकण्यात येऊन पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. गुळ धरणातील पंपिंग स्टेशनला फक्त आठ तास वीज पुरवठा होतो परंतु शहराला पाणी पूर्ण होण्यासाठी किमान वीस तास वीज पुरवठा होणे गरजेचे आहे. अशा कठीण काळात नगरपालिकेने दोन जनरेटर भाडयाने घेऊन ऐन कडक उन्हाळ्यात ४५अंश इतक्या तापमानातदेखील तरंगते पंप वाहून शहराला पाणीपुरवठा केला. जनरेटरद्वारे वीज पुरवठा करून पाणीपुरवठा करणारी ही महाराष्ट्रातील नव्हे देशातील एकमेव नगरपरिषद असल्याचा दावा देखील नगराध्यक्षा सौ.चौधरी यांनी केला. नवीन पाणीपुरवठा योजनेची कामे प्रगतीपथावर असून दोन हजार वीस पर्यंत पूर्ण होईल असे त्या म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, राहिलेले काम आम्ही जलदगतीने पुर्ण करू परंतु पाणी बचती बाबत सर्वांनी जागृत राहून नगरपालिकेला सहकार्य करावे. चोपडा नगरपालिकेचे नाव उंचविण्यासाठी आपली सर्वांची साथ आम्हाला हवी आहे त्यासाठी जनतेने सहकार्य करावे असे आवाहन ही लोकनियुक्त नगराध्यक्षा मनीषा चौधरी व गटनेते जीवन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.