चाळीसगाव प्रतिनिधी । कामगार हा देशाचा खरा सेवक असून त्यांच्या हितासाठी आपण कायम तत्पर असल्याचे प्रतिपादन युवा नेते मंगेश चव्हाण यांनी केले. ते राजपूत मंगल कार्यालयात आयोजित कामगार मेळाव्यात उदघाटक म्हणून बोलत होते.
राष्ट्रीय वस्त्रोद्योग सेवानिवृत्त कामगार संघर्ष समिती, वीज कामगार, एसटी कामगार, टेक्सटाईल मिल कामगार, बेलगंगा साखर कारखाना कामगार, को-ऑपरेटिव्ह बँक यांच्या समन्वय कृती समिती चाळीसगाव तर्फे ईपीएफ १९९५ च्या सर्व पेन्शनधारकांचा भव्य कामगार मेळावा याठिकाणी आयोजित करण्यात आला. ईपीएफ व त्या संदर्भातले सर्व कायदे, त्यातील नियम व अटी, कामगार कायदा यासर्व संबंधांचे मार्गदर्शन या कामगार मेळाव्यात झाले. या कार्यक्रमाचे उदघाटन युवा नेते मंगेश चव्हाण यांनी केले. याप्रसंगी ते म्हणाले की, कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे असे यथार्थ वर्णन कवी नारायण सुर्वे यांनी कामगारांबाबत केलेले आहे. कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी चळवळ चालवली. कामगारांचा हा लढा जगभर आहे. आपल्याकडील लहान-मोठी सर्व कामगार ही देशाची सेवक आहेत. त्यांनीच आपल्या परिसराला समृद्ध केले केले असल्याचे प्रतिपादन मंगेश चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर यांनी कामगारांची भूमिका मांडत, उद्योगाची कितीही भरभराट झाली, कितीही यंत्र आले तरी त्या यंत्रांना चालवणारे हात म्हणजे कामगारांचे असतात. हे हात बळकट करण्याचे काम सरकारच्या माध्यमातून व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक राऊत, राष्ट्रीय महासचिव वीरेंद्र राजावत, राष्ट्रीय मुख्य सल्लागार एन. पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच रमेश गोसावी, के.जी. देशमुख ,बी.एस. सोनार, सी.डी. ठाकरे, एम.जी. खन्ना, सुभाष जाधव, जे.एन. बाविस्कर, अनिल पवार, श्रीमती शोभा आरस, सौ. उषा राऊत, बाबुराव पाटील, उत्तम जाधव, एस.के. गवळी, एकनाथ पाटील, तात्यासाहेब निकम, एन.एल. जाधव आदी देखील उपस्थित होते.