चोपडा, प्रतिनिधी | तालुक्यातील अनेर काठावरील गलगी ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत धानोरा प्र. येथील ज्ञानेश्वर संतोष पाटील यांचा शेतात बिबट्याने गायींच्या वासराला ठार मारल्याची घटना काल (दि.६) उघडकीस आली आहे. अनेर नदी काठावरील वेळोदे, घोडगाव, कुसुंबा, परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
नुकताच कुसुंबा येथे बिबट्याने एका बकरीचा फडश्या पाडला होता. त्या अगोदर वेळोदे येथे गायींचा फडश्या पाडला होता. त्यावेळी त्या शेतमजूराने आपली गाय मारली म्हणून विषारी द्रव्य टाकून बिबट्यालाही मारून टाकले होते. त्यामुळे त्या शेतमजूराला जेलमध्ये जावे लागले आहे. एवढे झाले तरीही वनविभागाने या प्रकरणी लक्ष घातलेले नाही. बिबट्याला मारले म्हणून जेलमध्ये टाकणाऱ्या वनविभागाने गाय मेली म्हणून शेतमजूराला नुकसान भरपाई मिळाली का ? याकडेही लक्ष द्यायला हवे. बिबट्याच्या अस्तित्वाने परिसरातील जनता भयभीत झाली आहे. गेल्या १५ दिवसांपासून बिबट्या दिसत आहे, तरीही वनविभाग सुस्त असून पाहिजे तशी खबरदारी घेतली जात नसल्याने परिसरात नाराजी व्यक्त होत आहे.
धानोरा प्र. येथील ज्ञानेश्वर संतोष पाटील यांचे गावात रस्त्यालगत शेड आहे त्या शेडच्या बाहेर बांधलेले गायीचे वासरू बिबट्याने ठार मारले असून, ही घटना सकाळी ११.०० वाजेच्या सुमारास घडल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून गावकऱ्यांना मादी बिबट्या आणि त्याच्यासोबत दोन पिल्ले दिसत असल्याने परिसरात चांगलीच घबराट आहे. शेती कामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. या बिबट्यांचा बंदोबस्त झाला नसल्याने अनेकांची फवारणी, निंदणी, कोळपणी, करणे अशी अनेक प्रकारची कामे पडून आहेत. शेतमजूर मागील १० ते १५ दिवसांपासून शेती कामांसाठी गेले नसल्याचे चित्र आहे. वनाधिकारी यावर उपाययोजना करण्यासाठी जीवितहानी होण्याची वाट पाहत आहेत का ? असा संप्तत सवाल करीत असून वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.