जळगाव प्रतिनिधी | पाचव्या दिवशी गणपती विसर्जनासाठी रिक्षाने तापी नदीवर जात असतांना समोरील भरधाव वाहन अंगावर येत असल्याचे पाहून रिक्षाचालकाचा ताबा सुटल्याने ॲपे रिक्षा खड्ड्यात पडल्याने ४ जण गंभीर जखमी झाले. ही घटना चोपडा तालुक्यातील देवगाव या गावाजवळ घडली. चौघांना जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील धानोरा येथील देवा मित्र मंडळ ग्रुपच्या गणेशोत्सवाच्या आज पाचव्या दिवशी गणपती विसर्जनासाठी मालवाहू ॲपेरिक्षा गणपती ठेवून तापी नदीवर विदगाव येथे जात होते. रस्त्यातील देवगाव जवळ समोरून येणाऱ्या भरधाव वाहन अंगावर येत असल्याचे पाहून ॲपेरिक्षाचालक राहुल प्रकाश कोळी याचा रिक्षावरील ताबा सुटला आणि रिक्षा रोडच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. यात किरण प्रल्हाद पाटील (वय 17), अक्षय नाना कोळी (वय 15), अमोल राजू गुजर (वय 19), आणि गोविंदा सुरा कोळी (वय 12) सर्व रा. धानोरा ता. चोपडा हे चौघे गंभीर जखमी झाले चौघांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.