जळगाव प्रतिनिधी । शहरातील श्री गणेश स्नेहल प्रतिष्ठापनाचे यंदा 18 वे वर्ष आहे. गणेशोत्सवानिमित्त 8 दिवसांसाठी सामाजिक प्रबोधनावर आधारित कीर्तनमाला आयोजित करण्यात आली असून ‘तुला खांद्यावर घेईन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन’,’पार्वतीच्या बाळा, पायात वाळा’ अशा विविध भजन आणि धार्मिक गीतांनी पिंप्राळयातील आर.एल. कॉलनी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंप्राळयाच्या राजाचा मान असलेल्या स्नेहल प्रतिष्ठानचे यंदा १८ वे वर्ष आहे. मागील वर्षी सर्वोत्तम मंडळाचा मान पोलीस दलातर्फे मंडळाला मिळाला होता. यंदा सलग ८ दिवसांसाठी सामाजिक प्रबोधनावर आधारित कीर्तनमालाचे आयोजन करण्यात आले असून रात्री ८ वाजता कार्यक्रमाला सुरूवात केली जाते. मंगळवारी कीर्तनमालेतील प्रथम पुष्प भूषण जोशी महाराज यांच्या संगीतमय साईकथाचे आयोजन मंडळातर्फे करण्यात आले होते. त्यांनी साईबाबा यांच्या जीवनातील काही प्रेरणादायी प्रसंग सांगून नागरिकांना मार्गदर्शन केले. यात फकिराच्या कुटीत जाऊन त्याच्यासह भोजन करणे तसेच मशिदीत जाऊन सदिच्छा देत सर्वधर्म समभावाचा संदेश साईबाबा यांनी दिला होता. म्हणून साईबाबा हे तरुणांसह आबालवृद्धांचे प्रेरणास्थान बनलेय, असे भूषण महाराज जोशी यांनी यावेळी सांगितले. महाराज पुढे म्हणाले, सुश्राव्य भजनांनी वातावरण भक्तीमय बनले होते. त्यांनी साईबाबांसह भगवान महादेव, श्री गणेश, पार्वती, खंडेराया यांच्यावरील भजने व भक्तिगीते सादर केलीत. त्यांना ओम साई भजनी मंडळाने सहकार्य केले. यात ढोलकीवर राजू देशपांडे, ऑर्गनवर कैलास परदेशी, ऑक्टोपेडवर नितीन पाटील तसेच चंदू पोळ यांनीही गीते सादर केली. सूत्रसंचालन हरीश वाघ, आभार अमोल पाटील यांनी केले.
आज शिक्षकांचा सत्कार, सागर महाराज यांचे कीर्तन गुरुवारी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन असून आरतीचा मान शिक्षकांना दिला आहे. तसेच शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार देखील होईल. रात्री ८ वाजता कीर्तनमालेचे तिसरे पुष्प पारोळ्यातील रत्नपिंप्री येथील युवा कीर्तनकार ह.भ.प. सागर महाराज हे गुंफणार आहेत.