जळगाव प्रतिनिधी । गत अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असणारी विमानसेवा आज पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
याबाबत वृत्त असे की, जळगावात मोठ्या नवसाने विमानसेवा सुरू झाली असली तरी प्रतिसादाअभावी ही सेवा लागलीच बंद करण्यात आली होती. यानंतर ट्रु जेट कंपनीच्या माध्यमातून पुन्हा एकदा विमान सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होेत्या. खासदार उन्मेष पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला. या अनुषंगाने आज दिनांक १ सप्टेंबरपासून विमानसेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. आज सकाळी प्रवाशांना घेऊन मुंबईला विमान झेपावले. यानंतर साडेदहा वाजेच्या सुमारास अहमदाबाद येथून प्रवाशांना घेऊन आलेले विमान जळगाव विमानतळावर उतरले. या विमानातील प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी खासदार उन्मेष पाटील, आमदार चंदूलाल पटेल, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.