जळगाव, प्रतिनिधी । शहरातील रुस्तमजी शाळेच्या स्कूल बसला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने स्कूल बसमधील तीन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज (दि.३०) सकाळी घडली. जखमी विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, रुस्तमजी शाळेच्या बसचा (क्रमांक एम.एच. १९, वाय. ६००५) चालक ललित मोहन धिंगे (वय ४२, रा.रामेश्वर कॉलनी) १० वर्षांपासून चालक म्हणून काम करत आहे. हा सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास कालिका माता मंदिरासमोरून विद्यार्थ्यांना घेवून हॉटेल गौरवसमोरन जात असताना भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या ट्रकच्या (क्रमांक एम.एच. ४६, एफ. ०१२१) चालकाचा ट्रकवरील ताबा सूटल्याने त्याने सरळ बसला धडक दिली. या धडकेत बसमधील विद्यार्थी आरुष तुषार कोळी, गौरजा विश्वनाथ खडके व विराट सुयोग चोपडे यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. तिघांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान स्कूल बसचे चालकाच्या बाजूने नुकसान झाले आहे. एमआयडीसी पोलिसांनी ट्रक आणि स्कूल बस पोलिसात जमा केले असून ट्रक चालक गणेश विष्णू पाटील (रा. कर्की ता. मुक्ताईनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.