भुसावळ प्रतिनिधी । येथील नगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांशी संबंधीत आर्थिक गुन्हे शाखेचे पथक आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
भुसावळातील पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस.एल.पाटील यांनी पालिकेतील नऊ प्रकरणांमध्ये लाखो रुपयांचा गैरप्रकार झाल्याचा आरोप करत गुन्हे दाखल केले आहेत. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. या अनुषंगाने मंगळवारी सायंकाळी या शाखेचे एक पथक नगरपालिकेत दाखल झाले. त्यांनी या प्रकरणांशी संबंधीत काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणांमध्ये घनकचरा प्रकल्प, बाजार मक्ता फी, इंग्लिश स्पिकिंग क्लास, विविध रस्त्यांचे डांबरीकरण आदींचा समावेश आहे. ऐन निवडणुकीआधी आर्थिक गुन्हे शाखेने सुरू केलेल्या हालचालींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे.