जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या बहिष्कारामुळे स्थायीची सभा रद्द करावी लागली असून यामुळे हा वाद चिघळला आहे.
जिल्हा परिषदेत थेट अध्यक्षांनीच एक गट आणि अधिकारी आपल्याला काम करू देत नसल्याचा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली होती. यानंतर भाजपचेच जिल्हा परिषद सदस्य जयपाल बोदडे यांनी अध्यक्षांसह त्यांच्या जनसंपर्क अधिकार्यावर आरोप केले होते. तर उज्ज्वला पाटील यांनी याचा इन्कार केला होता. यानंतर शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या स्थायी सभेवर त्यांनी बहिष्कार टाकला. यामुळे अन्य सदस्य येऊनही स्थायीची सभा रद्द करावी लागली. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांच्या कामावर नाराज होऊन हे पाऊल उचलल्याचे वृत्त आहे. तर मस्कर यांनी मात्र आपण कोणतीही आडकाठी आणत नसल्याचे सांगितले आहे.