नवी दिल्ली वृत्तसंस्था । आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार व मनी लाँडरिंग प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर ते बेपत्ता झाले असून त्यांच्या जामीनावर आज निर्णय होणार आहे.
आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंग प्रकरणात चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामिनासाठीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील गौर यांनी २५ जानेवारी रोजी निकाल राखून ठेवला होता. यावर मंगळवारी सुनावणी झाली. यात ही याचिका फेटाळण्यात आली. चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण, सायंकाळी त्यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी कपिल सिब्बल यांना चिदंबरम यांची जामीन याचिका बुधवारी ज्येष्ठ न्यायाधीशांपुढे दाखल करण्याचे निर्देश दिले. चिदंबरम यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी व्हावी की नाही, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात आज घेतला जाणार आहे.
दरम्यान, न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर पी. चिदंबरम हे भूमिगत झाले आहेत. आज त्यांना सर्वोच्च न्यायालयातून दिलासा मिळणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.