
धरणगाव, प्रतिनिधी | येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल यांच्यावर आज दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या दफनविधीला जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेते उपस्थित होते. त्यांच्या अंत्ययात्रेत आज शहरात झालेली गर्दी यापूर्वी कुणाच्याच अंत्यसंस्कारावेळी दिसून आली नव्हती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

आज सकाळी दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या घरी नातलग, परिचित, कार्यकर्ते हितचिंतक व मान्यवरांची रीघ लागली होती. दुपारी त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून काढण्यात आली. प्रथम अंत्ययात्रा नगर पालिकेत नेण्यात येवून तिथे नमाज पठण करण्यात आले. त्यानंतर पारोळा नाक्याजवळील दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेवर ठिकठिकाणी नागरिक पुष्पवृष्टी करीत होते. त्यांच्या अंत्यसंस्काराला राज्याचे महसूल राज्यमंत्री व शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डी.जी. पाटील, मुस्लीम समाजातील नेते गफ्फार मलिक, कारीम सालार, जमील देशपांडे, येथील प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, न.पा. गटनेते पप्पू भावे, अनेक आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://www.youtube.com/watch?v=MhCipUohF8I&feature=youtu.be