Home Cities जळगाव एकलव्य मैदानावर लेवा समाजाचा महासागर ! वधू-वर महामेळाव्यात विवाहइच्छुकांनी नोंदविला सहभाग

एकलव्य मैदानावर लेवा समाजाचा महासागर ! वधू-वर महामेळाव्यात विवाहइच्छुकांनी नोंदविला सहभाग

0
3


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एकलव्य क्रीडा मैदानावर रविवार, २९ नोव्हेंबर रोजी लेवा नवयुवक संघाच्या वतीने आयोजित विश्वस्तरीय लेवा पाटीदार वधू-वर महामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. देशाच्या विविध भागांसह परदेशातूनही विवाहइच्छुक वधू-वर आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने एकलव्य मैदानावर लेवा समाजबांधवांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. सुमारे ८५० विवाहइच्छुक वधू-वरांनी या महामेळाव्यात सहभाग नोंदवित स्वतःचा परिचय करून देत भावी जीवनसाथीच्या शोधासाठी एकाच व्यासपीठाचा लाभ घेतला.

लेवा नवयुवक संघाच्या वतीने आयोजित या महामेळाव्यात विवाहइच्छुक तरुण-तरुणींसह त्यांच्या पालकांची मोठी उपस्थिती होती. व्यासपीठावरून विवाहइच्छुकांनी स्वतःची माहिती, शिक्षण, व्यवसाय तसेच अपेक्षित जीवनसाथीविषयी परिचय करून दिला. समाजातील विविध स्तरांतील विवाहइच्छुकांना एकत्र आणून परस्पर परिचयाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. बदलत्या काळाची गरज ओळखून यंदाच्या महामेळाव्यात तंत्रज्ञानाचाही प्रभावी वापर करण्यात आला. देशाबाहेर वास्तव्यास असलेल्या विवाहइच्छुक वधू-वरांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसतानाही ऑनलाइन माध्यमातून या उपक्रमात सहभागी होता यावे, तसेच परस्पर परिचय करून घेता यावा, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. ऑनलाइन सहभागाच्या सुविधेमुळे महामेळाव्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आणि देश-विदेशातील समाजबांधवांना या उपक्रमाशी जोडण्याची संधी मिळाली.

या भव्य सामाजिक उपक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली. प्रमुख पाहुणे म्हणून कुटुंबनायक ललित रमेश पाटील, डॉ. उल्हास पाटील, जळगावच्या महापौर दीपमाला काळे, आमदार राजूमामा भोळे, माजी आमदार शिरीषदादा चौधरी, डॉ. ए. जी. भंगाळे, ॲड. प्रकाश बी. पाटील आणि ॲड. केतन ढाके आदी मान्यवर उपस्थित होते. लेवा नवयुवक संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी व त्यांच्या पत्नी कीर्तीमालिनी चौधरी यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी विवाहइच्छुक तरुण-तरुणींना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. समाजातील युवक-युवतींना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी अशा प्रकारचे सामूहिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असून, सामाजिक एकोपा, परस्पर संबंध आणि समाजातील बांधिलकी मजबूत करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे मान्यवरांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन नितीन नेमाडे व प्रणिता झांबरे यांनी केले. महामेळाव्यास उपस्थित विवाहइच्छुक वधू-वर आणि त्यांच्या पालकांसाठी रुचकर भोजन व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच विवाहइच्छुकांची माहिती समाविष्ट असलेल्या वधू-वर परिचय सूचीचे वितरण करण्यात आले. या सूचीच्या माध्यमातून उपस्थितांना आपल्या पसंतीनुसार योग्य स्थळ शोधण्यासाठी मदत होणार आहे.हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी लेवा नवयुवक संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी, सुभाष भोळे सर, हितेंद्र चौधरी, जयेश भोळे, योगेश भोळे, सुनील महाजन, राजेश चौधरी, अनिल चौधरी, निळकंठ नारखेडे, ललित कोल्हे, पीयूष कोल्हे, शामकांत भंगाळे, डिगंबर पाटील (डिगु सर), प्रवीण राणे, गिरीश नारखेडे, रूपेश सरोदे यांच्यासह संघाच्या संपूर्ण पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound