Home क्राईम रावेर तालुक्यात अवैध दारू विक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे छापे ; चार...

रावेर तालुक्यात अवैध दारू विक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे छापे ; चार जणांविरुद्ध गुन्हे, ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त

0
6


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात विनापरवाना देशी व विदेशी दारूची विक्री करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. निंभोरा, गोलवाडे, खर्डी आणि एनपूर या चार ठिकाणी छापे टाकून विभागाच्या पथकाने अवैध दारूसाठ्यासह दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन जप्त केले. या कारवाईत एकूण ५६ हजार ५६० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रावेर तालुक्यातील विविध गावांमध्ये अवैधरीत्या देशी व विदेशी दारूची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले. दुय्यम निरीक्षक वाय. वाय. सूर्यवंशी, धनराज पाटील, जवान नरेंद्र पाटील, नंदू पवार आणि गोकुळ सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

छाप्यादरम्यान पथकाने ५.७६ लिटर विदेशी दारू, ६४ लिटर गावठी दारू तसेच दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे १ हजार १०० लिटर रसायन जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ५६ हजार ५६० रुपये असल्याची माहिती आहे. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, अवैध दारू विक्रीविरोधातील कारवाईमुळे संबंधित परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, रावेर शहर आणि महामार्गालगत असलेल्या काही धाब्यांवरही अवैध दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अशा धाब्यांची नियमित तपासणी करून नियमबाह्य प्रकार आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. शहरातील काही किरकोळ दारू विक्रेते ग्रामीण भागात जाऊन ठोक पद्धतीने दारू विक्री करत असल्याचाही आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अशा विक्रेत्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून ग्रामीण भागातील अवैध दारू विक्रीचे जाळे रोखण्यासाठी विभागाने सातत्याने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound