Home Cities चोपडा वाळकी शेंदणी सरपंच प्रकरणात अपर विभागीय आयुक्तांचा अंतरिम दिलासा ; अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या...

वाळकी शेंदणी सरपंच प्रकरणात अपर विभागीय आयुक्तांचा अंतरिम दिलासा ; अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अपात्रतेच्या आदेशाला स्थगिती

0
2


चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील वाळकी शेंदणी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासंदर्भातील वादाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे. अपर विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांनी अपर जिल्हाधिकारी, जळगाव यांनी दिलेल्या अपात्रतेच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे अपीलार्थी रुख्माबाई शामराव साळुंके (रुख्माबाई वसंत कोळी) यांना अंतरिम दिलासा मिळाला असून, त्या सरपंचपदी कायम राहिल्या आहेत. या आदेशामुळे ग्रामपंचायतीतील सरपंच पदाबाबतच्या पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

वाळकी शेंदणी येथील रहिवासी दिपाली दीपक पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1959 मधील कलम 31 आणि 10(1-अ) अन्वये ग्रामपंचायत विवाद अर्ज दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अपर जिल्हाधिकारी, जळगाव यांनी 18 नोव्हेंबर 2026 रोजी अपीलार्थी रुख्माबाई साळुंके यांच्याविरोधात अपात्रतेचा आदेश पारित केला होता. या आदेशाविरुद्ध रुख्माबाई साळुंके यांनी अपर विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांच्याकडे अपील दाखल केले.

अपील दाखल करताना अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करणारा स्वतंत्र अर्जही सादर करण्यात आला होता. अपीलार्थींच्या वतीने मांडण्यात आलेले कायदेशीर मुद्दे, सादर केलेले अभिलेख आणि प्रकरणातील उपलब्ध परिस्थिती विचारात घेऊन अपर विभागीय आयुक्तांनी 18 नोव्हेंबर 2026 रोजीच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली.

या प्रकरणात मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या मुद्द्याला विशेष महत्त्व होते. अपीलार्थींच्या वतीने अॅड. वसंत भोलाणकर यांनी कायदेशीर बाजू मांडली. त्यांच्या युक्तिवादाच्या पार्श्वभूमीवर या टप्प्यावर अपील प्रथमदर्शनी ग्राह्य धरून अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यात आली. त्यामुळे अपीलार्थींना तात्पुरता न्यायालयीन दिलासा मिळाला आहे.

अपर विभागीय आयुक्तांच्या अंतरिम आदेशामुळे रुख्माबाई साळुंके यांचे सरपंचपद सध्या कायम राहिले आहे. मात्र, हा अंतरिम आदेश असून प्रकरणाचा अंतिम निकाल अद्याप झालेला नाही. त्यामुळे पुढील सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि उपलब्ध कागदपत्रे विचारात घेतल्यानंतर अंतिम निर्णय काय होतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound