Home Cities चोपडा महात्मा फुले यांच्या समतेच्या आणि शिक्षणाच्या विचारांमुळे महाराष्ट्राची प्रगती – प्राचार्य डॉ....

महात्मा फुले यांच्या समतेच्या आणि शिक्षणाच्या विचारांमुळे महाराष्ट्राची प्रगती – प्राचार्य डॉ. महादेव वाघमोडे

0
2


चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजाला दिलेला समतेचा संदेश आणि शिक्षणाचा विचार आजही तितकाच कालसुसंगत आहे. समाजात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी तसेच नव्या पिढीला महापुरुषांचे विचार आणि साहित्य परिचित करून देण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन पंकज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमोडे यांनी केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पंकज महाविद्यालयात आयोजित भव्य पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि समतेचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा जागर करण्याच्या उद्देशाने या पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी महापुरुषांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रा. दिलीप पाटील यांनी पुस्तक प्रदर्शनामागील भूमिका स्पष्ट केली. महात्मा फुले यांचे विचार आणि साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांची ओळख व्हावी, या उद्देशाने प्रदर्शन भरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रदर्शनात महात्मा ज्योतिबा फुले लिखित ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्याचा आसूड’, ‘सार्वजनिक सत्यधर्म’ आणि ‘तृतीय रत्न’ यांसारख्या महत्त्वपूर्ण ग्रंथांचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज तसेच विविध समाजसुधारकांच्या जीवनचरित्रांवर आधारित पुस्तके आणि वैचारिक साहित्यही वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले.

महापुरुषांचे साहित्य केवळ वाचण्यापुरते मर्यादित न ठेवता त्यातील विचार आत्मसात करून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवावेत, असे आवाहन प्रा. दिलीप पाटील यांनी केले. अशा ग्रंथांच्या वाचनातून सामाजिक समता, शिक्षणाचे महत्त्व, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाची जाणीव अधिक दृढ होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले. पंकज महाविद्यालयात आयोजित या पुस्तक प्रदर्शनाला विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातील विविध पुस्तके आणि साहित्याची माहिती घेतली. महात्मा फुले यांच्या विचारांचा परिचय करून देणाऱ्या या उपक्रमामुळे महाविद्यालयीन परिसरात वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळाले.


Protected Content

Play sound