
चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांची इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आक्षेपार्ह पोस्टद्वारे बदनामी केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी माचला (ता. चोपडा) येथील विकास ईश्वर निकम याला पोलिसांनी ताब्यात घेऊन नोटीस बजावली आहे.

याबाबत योगेश भास्कर पाटील (वय ४७, रा. रामानंद नगर, ता. जळगाव) यांनी गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी चोपडा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारीनुसार, दि. ०९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपासून ते दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजेदरम्यान विरवाडा फाट्याजवळील रस्त्यावर तसेच सोशल मीडियावर हा प्रकार घडला.
संशयित आरोपी विकास ईश्वर निकम याने आपल्या ‘chopdapoliticalcomedy’ या इंस्टाग्राम अकाउंटवरून वारंवार आणि वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट अपलोड करून त्या व्हायरल केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. शिवसेना पक्षाचे लोकनियुक्त आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांची जनमानसात वैयक्तिक प्रतिमा मलिन करणे आणि जनतेत त्यांच्याबद्दल दिशाभूल व बदनामी करण्याच्या उद्देशाने या पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात भाग ५ गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९६, ३५६(२), ३५१(२) आणि ३५२ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपी विकास ईश्वर निकम याला तात्काळ ताब्यात घेऊन कायदेशीर नोटीस दिली आहे.
सदर प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पवन देसले आणि पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी हे करत असून, गुन्ह्याची नोंद पोलीस नाईक जगदीश चौधरी यांनी केली आहे.



