Home Cities जळगाव जळगावात संविधान गौरव दिनानिमित्त लोकशाही मूल्यांचा जागर, प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांचे...

जळगावात संविधान गौरव दिनानिमित्त लोकशाही मूल्यांचा जागर, प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांचे व्याख्यान

0
3


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय संविधानाचा आत्मा, लोकशाही मूल्ये आणि नागरिकांची भूमिका यांचा वेध घेणारे ‘आम्ही भारताचे लोक’ या विषयावरील विशेष व्याख्यान जळगावात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. संविधान गौरव दिनानिमित्त जय महाराष्ट्र कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद जळगाव आणि प्रशिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीतील राजर्षी शाहू महाराज सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी यावेळी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर होत्या.

अमळनेर येथील सुप्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी ‘आम्ही भारताचे लोक’ या विषयावर सखोल विवेचन करत भारतीय संविधानातील लोकशाही मूल्यांचे महत्त्व विशद केले. भारतीय संविधानाची सुरुवात असलेल्या उद्देशिकेतील ‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दांमधून देशातील नागरिकांचे सार्वभौमत्व, लोकशाहीची ताकद आणि सामूहिक जबाबदारी अधोरेखित होते, असे त्यांनी आपल्या व्याख्यानातून स्पष्ट केले. संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले अधिकार, कर्तव्ये आणि लोकशाही व्यवस्थेतील त्यांची भूमिका याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी संविधानातील विचारांची जपणूक करण्याबरोबरच त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. संविधानाने दिलेली मूल्ये केवळ पुस्तकांपुरती मर्यादित न राहता दैनंदिन जीवनात आणि प्रशासकीय कामकाजातही प्रतिबिंबित झाली पाहिजेत, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार चौधर यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी जपान दौरा यशस्वी केल्याबद्दल पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र सोनवणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशाचे कौतुक करून उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, सार्वजनिक विद्यालय असोदा येथील मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, बेंडाळे कॉलेज जळगावचे उपप्राचार्य प्रा. डॉ. सत्यजित साळवे आणि जय महाराष्ट्र कर्मचारी संघटनेचे पालक अध्यक्ष आर. टी. सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

या व्याख्यानाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी जय महाराष्ट्र कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नितीन लोलगे, जिल्हाध्यक्ष प्रमोद काळे, सचिव पुरुषोत्तम पाटील, बापू पानपाटील, सुनील सोनवणे, मंगल पाटील, शिवराम शिरसाठ, शिरीष चौधरी, दिलीप सपकाळे, विजय लूल्हे आणि प्रा. डॉ. प्रदीप सुरवाडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound