
सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारत हा जगातील यशस्वी लोकशाही व्यवस्था असलेला महान देश असून, जगातील सर्वात मोठ्या लिखित राज्यघटनेचा अभिमान प्रत्येक भारतीयाला आहे. मात्र, संविधानाचा अभिमान बाळगण्याबरोबरच त्यात नमूद केलेले नागरिकांचे हक्क, अधिकार आणि कर्तव्ये यांचाही बारकाईने अभ्यास करून समाज व देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी केले. संविधान दिनानिमित्त महाविद्यालयात आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते.

तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सण व उत्सव समितीच्या वतीने संविधान दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मनोहर सुरवाडे, उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील, राष्ट्रीय सण व उत्सव समितीचे चेअरमन प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी, प्रा. डॉ. ताराचंद सावसाकडे, प्रा. डॉ. शरद बिऱ्हाडे, प्रा. डॉ. रवी केसुर, प्रा. डॉ. सविता कलवले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सतीश पाटील, प्रा. डॉ. निखिल वायकोळे, प्रा. शिवाजी मगर, प्रा. दिलीप बोदडे, प्रा. स्नेहल देशमुख, श्री. नितीन सपकाळे, श्री. आर. आर. जोगी, श्री. गणेश चव्हाण यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. तसेच भारतीय संविधानाच्या प्रतीला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी प्रास्ताविकातून संविधान दिन साजरा करण्यामागील भूमिका आणि उद्देश स्पष्ट केला. संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत संविधान सभेचे आणि विशेषतः मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी नमूद केले. दोन वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर भारतीय संविधानाची निर्मिती झाली. या प्रक्रियेत विविध देशांच्या राज्यघटनांचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव करून दिली असून, त्यामुळे भारतीय असल्याचा सार्थ अभिमान वाटतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी संविधानाचा गाभा असलेली उद्देशिका उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून सामूहिकरीत्या वदवून घेतली. संविधानाने प्रत्येक नागरिकाला सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रांत समता, स्वातंत्र्य व बंधुतेची मूल्ये दिली आहेत. ही मूल्ये केवळ संविधानात वाचण्यापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
भारत प्रजासत्ताक देश असल्याचा प्रत्येक नागरिकाला अभिमान असला पाहिजे. मात्र, नागरिकांना मिळालेल्या हक्क आणि अधिकारांचा उपयोग करताना आपल्या कर्तव्यांचेही भान ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. संविधानाचा सखोल अभ्यास केल्याने लोकशाही व्यवस्था, नागरिकांची जबाबदारी आणि देशाच्या विकासातील आपली भूमिका अधिक स्पष्ट होते. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने संविधान बारकाईने वाचावे, त्यातील मूल्ये समजून घ्यावीत आणि समाज व राष्ट्राच्या उन्नतीसाठी समर्पित भावनेने योगदान द्यावे, असा मौल्यवान सल्ला प्राचार्य डॉ. वाघुळदे यांनी दिला. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय सण व उत्सव समितीचे चेअरमन प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. शेखर महाजन, अमित गारसे आणि विनायक वाघोदे यांनी विशेष परिश्रम घेतले.



