Home प्रशासन बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा थंडबस्त्यात ; जीवघेण्या अडथळ्यांवर कारवाई कधी?

बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा थंडबस्त्यात ; जीवघेण्या अडथळ्यांवर कारवाई कधी?

0
1


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातून जाणाऱ्या बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील वादग्रस्त अतिक्रमण हटविण्याचा प्रश्न पुन्हा एकदा थंडबस्त्यात पडल्याचे चित्र दिसत आहे. रस्ता रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यासाठी मुदत मागितल्याची चर्चा पुढे आल्यानंतर ही कारवाई थांबल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महामार्गावरील अतिक्रमणाचा प्रश्न कधी मार्गी लागणार आणि प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेणार, असा सवाल शहरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

यावल शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयापासून बसस्थानक परिसर, बुरूज चौक आणि चोपडा नाका या प्रमुख मार्गावरून राष्ट्रीय महामार्ग जातो. या मार्गाच्या दोन्ही बाजूंना गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक अतिक्रमणे झाल्याचे चित्र आहे. रस्त्याच्या कडेला दुकाने थाटण्यात आल्याने महामार्गाची उपलब्ध जागा कमी झाली असून, या अतिक्रमित दुकानांमधून मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक उलाढाल होत असल्याचेही सांगितले जाते. महामार्गावर वाढलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची शिस्त बिघडली असून, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना पुरेशी जागा मिळत नसल्याने वाहतुकीचा ताण वाढतो. विशेषतः गर्दीच्या वेळेत वाहनांची कोंडी आणि पादचाऱ्यांची गैरसोय होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या मार्गावर यापूर्वी अनेक अपघात घडले असून, काही नागरिकांना जीव गमवावा लागला, तर अनेक जण गंभीर जखमी होऊन कायमस्वरूपी अपंगत्वाला सामोरे गेले आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ वाहतुकीपुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या सुरक्षिततेशी जोडला गेला आहे.

दरम्यान, मागील महिन्यात या महामार्गावरील रस्ता रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली होती. त्यावेळी स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाहीही सुरू करण्यात आली होती. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आता मार्गी लागेल, अशी अपेक्षा शहरातील नागरिकांना वाटू लागली होती. मात्र, या कारवाईदरम्यान काही व्यक्तींनी शासकीय जागेवर कब्जा करून ती गरजू व्यावसायिकांना भाड्याने दिल्याची चर्चा आहे. अतिक्रमण हटविण्याच्या प्रक्रियेत काही मंडळींनी राजकीय हस्तक्षेप करीत आणखी काही दिवसांची मुदत मागितल्याचे सांगितले जाते. संबंधित अतिक्रमणधारक स्वतःहून अतिक्रमण काढून घेतील, अशी चर्चा झाल्यानंतर प्रशासनाची कारवाई थांबल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र, त्यानंतर प्रत्यक्षात अतिक्रमणे हटविण्याबाबत ठोस कार्यवाही झाल्याचे दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

अतिक्रमण हटविण्याची कारवाई थांबल्याने रस्ता रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या कामावरही त्याचा परिणाम होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे कायम राहिल्यास वाहतुकीची समस्या आणि अपघातांचा धोका कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ मुदत देण्याच्या चर्चेवर न थांबता अतिक्रमणांची अधिकृत मोजणी करून शासकीय जागेवरील अतिक्रमणांबाबत नियमानुसार ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. यावल शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या महामार्गावरील अतिक्रमणांचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचणे आवश्यक आहे. अतिक्रमण हटविण्याची कारवाई नेमकी कधी सुरू होणार, संबंधितांना आणखी मुदत दिली जाणार का आणि प्रशासनाची अधिकृत भूमिका काय असणार, याकडे यावलकरांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound