Home क्राईम कामाच्या शोधात गेलेल्या जळगावच्या मजूर कुटुंबावर गुजरातमध्ये काळाचा घाला! सहा जणांना कालव्यात...

कामाच्या शोधात गेलेल्या जळगावच्या मजूर कुटुंबावर गुजरातमध्ये काळाचा घाला! सहा जणांना कालव्यात फेकले; पती-पत्नीसह मुलीचा मृत्यू, दोन मुले बेपत्ता

0
2


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पोटाची खळगी भरण्यासाठी कामाच्या शोधात जळगाव जिल्ह्यातून गुजरातमध्ये गेलेल्या एका मजूर कुटुंबावर काळाने क्रूर घाला घातला आहे. गुजरातमधील सूरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ चार अज्ञात व्यक्तींनी एका मजूर कुटुंबातील सहा जणांना जबरदस्तीने खोल कालव्यात फेकून दिल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या अमानुष प्रकारात पती-पत्नीसह त्यांच्या एका मुलीचा मृत्यू झाला असून दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. तर एका १३ वर्षीय मुलाने कालव्यातील पाइपचा आधार घेत मृत्यूच्या दाढेतून स्वतःची सुटका करून घेतली. या घटनेने जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील हे मजूर कुटुंब २१ नोव्हेंबर रोजी कामाच्या शोधात चारचाकी वाहनाने गुजरातमधील सूरतकडे निघाले होते. रोजगाराच्या आशेने प्रवास करणाऱ्या या कुटुंबाला बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ भयानक प्रसंगाला सामोरे जावे लागले. दुसऱ्या एका कारमधून आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी त्यांचे वाहन अडवले. त्यानंतर कुटुंबातील सहाही सदस्यांना जबरदस्तीने उकाई-काकरापार लेफ्ट बँक कालव्याच्या खोल पाण्यात फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे.

कालव्यातील पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने कुटुंबातील सदस्यांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. या घटनेत नितीन ऊर्फ भुरिया पाटील, त्यांची पत्नी कविता पाटील आणि त्यांच्या एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या तिघांचे मृतदेह महुवा तालुक्यातील डुंगरी परिसरातील कालव्यात आढळून आले आहेत. रोजगाराच्या शोधात घराबाहेर पडलेल्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

या भीषण प्रसंगात १३ वर्षीय मुलाने मात्र विलक्षण प्रसंगावधान राखले. कालव्यात फेकल्यानंतर त्याने पाण्यातील एका पाइपला घट्ट पकडून ठेवले. मृत्यूशी झुंज देत त्याने स्वतःचा जीव वाचवला आणि कसेबसे कालव्याबाहेर येण्यात यश मिळवले. त्यानंतर जवळच्या एका हॉटेलमध्ये धाव घेत त्याने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. या मुलाने दिलेल्या माहितीमुळे या अमानुष घटनेचा उलगडा झाला आणि पोलिसांना तपासाची दिशा मिळाली.

दरम्यान, या घटनेत प्रथमेश पाटील आणि हरीश संजय पाटील ही दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलिसांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. कालव्याच्या पाण्याचा प्रवाह आणि परिसराची परिस्थिती लक्षात घेऊन शोधकार्य केले जात आहे. बेपत्ता मुलांचा शोध लागण्याकडे जळगावमधील त्यांच्या नातेवाइकांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणी सूरत जिल्ह्यातील बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंबातील सहाही जणांना कालव्यात फेकण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पोलिसांनी या घटनेकडे हत्येच्या दृष्टिकोनातून पाहत तपासाला वेग दिला आहे. सूरत ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राजेश गढिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींची ओळख पटली असून त्यांच्या अटकेसाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

आरोपींचा शोध घेण्यासाठी तब्बल ६० पोलिसांची पथके आणि तपासासाठी आठ स्वतंत्र टीम तैनात करण्यात आल्या आहेत. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), विशेष कार्य पथक (एसओजी), पॅरोल फर्लो पथक, स्थानिक डी स्टाफ, तांत्रिक पथक तसेच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाचा समावेश आहे. बारडोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दुसरीकडे, जळगाव पोलीसही सूरत ग्रामीण पोलिसांच्या संपर्कात असून घटनेची सविस्तर माहिती घेत आहेत. जळगाव जिल्ह्यातील एका मजूर कुटुंबावर परराज्यात अशा प्रकारे संकट ओढवल्याने नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दोन बेपत्ता मुलांचा शोध, मृतांच्या कुटुंबीयांना न्याय आणि या अमानुष कृत्यामागील कारणांचा उलगडा होण्याची प्रतीक्षा आहे.


Protected Content

Play sound